कालबाह्य शिक्षण पद्धतीला पूर्णविराम !

Teaching Photo by Pixabay from Pexels: https://www.pexels.com/photo/man-in-black-and-white-polo-shirt-beside-writing-board-159844/
Reading Time: 4 minutes

कालबाह्य शिक्षण पद्धतीला पूर्णविराम !

मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो तो तितकाच यशाच्या शिखरावर जातो. शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपुर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी महत्वाची असते. देशाला आर्थिक महासत्ता आणि प्रभावी राष्ट्र बनवण्यात युवक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, त्यामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणा-या शिक्षण पद्धतीची आता देशाला गरज आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा पाया शाळेतच रचला जातो, शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार, मुल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते.

मुलत: सध्याची शिक्षण पद्धति ही प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण या त्रिस्तरिय शिक्षण पद्धतीनुसार कार्यान्वित आहे.  प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे.  प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण हे बुद्धिमत्ताविकास, आकलन, प्राचीन काळ, संस्कृती, भूगोल व इतिहास यावर आधारित असेलतर ठीक आहे. परंतु, त्याचबरोबर सद्यस्थितितील आव्हानांची जाणीव व ओळख करुन देण्याचे आव्हान शिक्षण क्षेत्रापुढे आहे. त्यामुळे आजच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी व्यक्तिमत्व विकास, कला व क्रीडा आणि उद्योजकता या सुप्त गुणांना चालना करुन देणारे स्पर्धात्मक शिक्षण उच्च माध्यमिक ते महाविद्यालयीन शिक्षणात विद्यार्थ्यांना देणे क्रमप्राप्त आहे.

कला, क्रीडा कृषि शिक्षण

कला क्रीडा

ग्रामीण भागातून कला व क्रीडा नैपण्य विकास कार्यक्रम आखणी व अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तालुका व जिल्हा स्तरावर उपलब्ध साधन व सुविधा नुसार या कार्यक्रमा द्वारे विद्यार्थी वर्गवारी करुन या स्तरावरच नैपुण्य विकास होणे गरजेचे आहे. तसेच, शिक्षक, प्रशिक्षक व विद्यार्थी हे केवळ पुस्तकी ज्ञाना पुरते नसावेत.  कला, क्रीडा विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी नियमित प्रात्यक्षिके, मैदानी सराव, स्पर्धा यांचे आयोजन करुन अनेक राज्य व राष्ट्रस्तरीय खेळाडू व कलाकार घडू शकतील.

कृषि

शालेय अभ्यासक्रमात कृषिला स्थान देणे मोठे गरजेचे आहे. आपला देश कृषिप्रधान म्हणून ओळखला जातो. आजही आपली अर्थव्यवस्था म्हणजेच राष्ट्रिय अर्थव्यवस्था ही बहुतांश कृषिवरच अवलंबून आहे, देशाच्या महसुलात 50% पेक्षा जास्त योगदान ग्रामीण अर्थव्यवस्थेचे आहे. पिकांची ओळख, शेतीची निगा, पेरणी इ. चा समावेश शालेय अभ्यासक्रमात असला तरी ही महाविद्यालयीन शिक्षणात कृषिसंशोधन, तंत्रज्ञान यावर आधारित अभ्यासक्रम सुरु करणे आवश्यक आहे. याच बरोबर कृषि विद्यापीठाची संख्या वाढवून, त्या अंतर्गत कृषि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रम आणि कृषिआधारित उद्योजकता विकास अभ्यासक्रम राबवणे अत्यावश्यक आहे. पदवी शिक्षण घेतानाच विद्यार्थ्यांचा कृषि विषयक दृष्टिकोन बदलणे महत्वाचे आहे. पदवी शिक्षणात कृषि तंत्रज्ञान व कृषि उद्योजकते विषयी शिक्षणाद्वारे नक्कीच कृषि आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत अधिक सुधारणा होऊ शकतील. ग्रामीण  विद्यार्थी केवळ परीक्षार्थी न राहता उद्यमशील होईल. ग्रामीण भागामध्ये अनेक छोटे,मोठे उद्योग स्थापले जातील. अनेक युवकांना उद्योजक म्हणून मान-सन्मान मिळून, राष्ट्रिय अर्थव्यवस्थेत लक्षणीय भूमिका बजावतील. या उद्योगातुन अनेक नोक-या, रोजगार उपलब्ध होऊन बेरोजगारी दूर होऊ शकेल.

ग्रामीण शिक्षण प्रशिक्षण पद्धति

   ग्रामीण शैक्षणिक धोरण, दृष्टिकोण बदलणे नितांत आवश्यक आहे. ग्रामीण विद्यार्थी तालुका स्तरीय औद्योगिक शिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेण्यास जातो. त्यास सुतार काम, जोडारी, लोहारी म्हणजेच बलुतेदारी सारखे अभ्यासक्रम शिकविले जातात. प्रत्यक्षात यातील ग्रामीण रोजगाराचे व नोक-याचे प्रमाण दिवसेंदिवस लुप्त होते आहे. त्याऐवजी, पायाभूत सुविधेसह कृषितंत्र व कृषि उद्योगावर अधारित अभ्यासक्रमांचा समावेश या प्रशिक्षण संस्थेत केल्यास ग्रामीण शिक्षण पद्धति व अर्थव्यवस्थेची नक्कीच पुनर्रचना होऊ शकेल.

   सर्वसाधारण, उच्च माध्यमिक शिक्षण समवेत विद्यार्थ्याच्या जडण-घडण प्रक्रियेस प्रारंभ होतो. याच वयोमानात विद्यार्थ्यामध्ये सामाजिक व व्यवहारिक जाण येते. म्हणून, उच्च मा.शिक्षण समवेत व्यक्तिमत्व व स्पर्धात्मक शिक्षणाचा अंतर्भाव व्हायला हवा, जेणेकरून विद्यार्थ्याची व्यक्तिमत्व जडण-घडण व येणा-या स्पर्धेला तोंड देण्याची पात्रता, कुवत तयार झाली पाहिजे.

 माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण

उच्च शिक्षण गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देणे गरजेचे आहे. कालानुरूप नवीन विषय, नवे अभ्यासक्रम, आवश्यक साधनसुविधा, नव्या अभ्यासपद्धती यांना प्राधान्य देऊन त्यांच्या प्रसाराला प्रोत्साहन देणे हे एक आव्हान आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीमुळे बेरोजगारांची संख्या वाढत आहे. अशा शिक्षण पद्धतीऐवजी रोजगाराभिमुख शिक्षण पद्धतीची गरज आहे. यावरील एकमेव उपाय म्हणजे देशातील शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करणे हा होय.

    प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण पद्धती विद्यार्थ्याच्या संस्कारण, बुद्धिमत्ता आणि आकलन शक्ति विकास यावर केन्द्रित करण्यासाठी आखलेली आहे. भाषा, गणित व शास्त्रांचा त्यात समावेश आहे. विद्यार्थ्याचा शालांत शिक्षण पर्यंतचे भाषा ज्ञान व गाढ़ा अभ्यास पुरेसा आहे, मग इयत्ता अकरा व बारावी मध्ये भाषा विषयाची काय आवश्यकता? त्याऐवजी, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास व स्पर्धेला सामोर जाण्यासाठी स्पर्धात्मक अभ्यासक्रमाचा समावेश करणे गरजेचे नाही काय? मुळात शिक्षण घेणे का आवश्यक आहे, शिक्षणामुळे विद्यार्थ्याचा साक्षर, सुसंस्कृत विकास होईल, हे झाले पुराणातील गुरु- शिष्य संबंधित परन्तु, संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास हे सर्व शिक्षणाचे उद्दिष्ट मानल्यास, प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वा चे मूल्यमापन हे त्याच्या क्षमता, त्याची बुद्धिमत्ता, तसेच छंद, सवयी, वृत्ती/दृष्टिकोन, जीवनविषयक मूल्ये, शारीरिक क्षमता व कृती या सर्व आयामांसह होणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षक, पालक, संस्थाचालक, प्रशासक, आणि विद्यार्थी या सर्व घटकांत जागृती हवी.

पदवीधर ‘  बेरोजगारीत वाढ़

सध्याच्या शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमुळे केवळ बेरोजगारी वाढत आहे त्याचे काय? पदवी परीक्षा प्रमाणपत्र हे तर शोभेची वस्तु झाले आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी ‘पदवीधर’ होउन ‘बेरोजगारी’ मध्ये भरती होत आहेत. केवळ पदवी शिक्षण घेतल्याने औद्योगिक क्षेत्रातील संधी धूसर होत आहे. सरकारी खात्यात तर नोक-याची वानवाच आहे. मग ही ‘बेरोजगार’ भरती ओसरणार कधी? व कशी?

त्यासाठी, सद्यस्थितितील शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करून प्रत्येक अभ्यासक्रमाबरोबरच स्पर्धात्मक व सॉफ्ट टेक्नोलोजिकल (तंत्रशिक्षण) व्यवसायीक आणि उद्योजकता विकास यावर अधारित अभ्यासक्रमाची साथ पदवी परीक्षेला मिळणे आवश्यक आहे. पुस्तकी ज्ञानाची ‘पदवी’ परीक्षा उतीर्ण होऊन ‘बेरोजगार’ भरती होण्यापेक्षा कौशल्य शिक्षणामुळे व्यावसायीक किंवा औद्योगिक रोजगार, नोकरी प्राप्त करू शकेल, मगच पदवी परीक्षेला ख-या अर्थाने महत्व प्राप्त होईल.

     वास्तविक, सद्यस्तीथितील अभ्यासक्रम हे 25 ते 30 वर्षापूर्वीच सरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील नोक-या करीता आखलेला होता. परन्तु, या दोन्ही क्षेत्रात नोक-याचे प्रमाण हे अत्यल्प झाले आहे. सद्याच्या औद्योगिक क्षेत्रातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखांचा उपयोग फक्तं मुलाखती पुरताच होतो. प्रत्यक्ष व्यवहार व कामांत यांचा काय उपयोग? मग हा अभ्यासक्रम कालबाह्य झाला नाही का?  तसेच कालबाह्य अभ्यास पद्धती बंद करून, पुनर्रचना करून याच महाविद्यालयात तंत्रशिक्षण, व्यवसायीक व कृषितंत्र शिक्षण यासारखे अभ्यासक्रम चालवून सद्याच्या औद्योगिक क्षेत्रासाठी, आगामी काळासाठी कुशल मनुश्यबळ निर्मिती त्यामुळे होऊ शकेल, बेरोजगारी दूर होईल.

     शिक्षण राष्ट्रनिर्मितीचे, विकासाचे प्रमुख साधन म्हणून मानले जाते. त्या दृष्टीने शिक्षणाकडे जास्त डोळसपणे, जागरूकपणे पाहून अपेक्षित बदल समजून घेणे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. धोरणात्मक निर्णय आणि घोषणा यांच्यापेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि प्रयोग यांना महत्त्व दिले पाहिजे. आज आपला देश, सरकारी धोरण औद्योगिकिकरणाकड़े वळत असतांना मग त्याच दिशेने आपले शैक्षणिक धोरण आणि अभ्यासक्रम आखले जाऊ नयेत का? देश, सरकारी धोरण औद्योगिकीकरणाकडे आणि शैक्षणिक पद्धती ऐतिहासिक, प्राचीन म्हणजेच कालबाह्य, आहे ना हा विरोधाभास ! या कालबाह्य शिक्षण पद्धतीला नुसताच विराम न देता ‘पूर्णविराम’ देऊन कला व क्रीडा, तंत्र व व्यावसायीक शिक्षण तसेच कृषितंत्र व कृषि उद्योग विद्यापिठांची स्थापना करून त्या अंतर्गत या विषयांवर अधारित अभ्यासक्रमाचा समावेश करणे जरुरीचे आहे. सुधारीत शिक्षण पद्धतीमुळे नक्कीच शहरी व ग्रामीण समतोल साधला जाईल. शहरीकरणाला तंत्र व व्यावसायीक शिक्षण तारेल तर कृषितंत्र व कृषि उद्योग शिक्षण ग्रामीण क्षेत्रावर केन्द्रित असेल.

  अंततः,   तुमच्यातील जे काही सर्वोत्तम आहे ते प्रकट करणे म्हणजे खरे शिक्षण. खरे तर शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे, जे वापरून तुम्ही प्रत्यक्ष जग बदलताना बघू शकता. केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यास सुरुवात केली आहे. शालेय शिक्षणाचा दर्जा सुधरविणे, उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात संशोधन आणि नवोन्मेषास प्राधान्य देणे, विद्यापीठांना स्वायत्तता देणे, हे बदल अपेक्षीत आहेत. आपल्या देशात शालेय अभ्यासक्रमाविषयी अतिशय चौकटीबद्ध धोरण नेहमी राबविले गेले आहे. त्यामुळे विद्यार्थी भरमसाट अभ्यासक्रमाच्या ओझ्याखाली दबून जातात. शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, यासाठी अभ्यासक्रमामध्ये कपात करण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे, जो अभिनंदनीय आहे.

Leave a Reply